एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे पालकांना प्रवेशाबाबत आवाहन
औरंगाबाद, दि.04 (जिमाका) :- आदिवासी विकास विभागाअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. परंतु सद्यपरिस्थितीमध्ये कोरोना (कोविड-19) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेश पुर्व ऑनलाईन स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तथापी त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2019-20) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे, असे श्रीपाद व. मेहेत्रे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये कोणत्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाच्या इयत्तेच्या आधिच्या वर्षातील प्रथम सत्राचे गुणपत्रक लिंकवर अपलोड करावे. मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. हे पालकांनी लक्षात घ्यावे तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेश हे त्यांचे पालकांच्या मुळच्या राहण्याच्या पत्त्यानुसार संबंधीत प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यान्वित असलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येईल. mtpss.org.in या लिंकवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यातील ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र यापुर्वी भरलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, संबंधित मुख्याध्यापकांनी दि. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत फॉर्म भरण्यात यावे याची नोंद घ्यावी. mtpss.org.in या लिंकवर अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचणी उद्भवल्यास 0240-2486069 यावर संपर्क करावा poitdp.abd-mh@gov.in या मेलवर मेल करावा, असेही प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी कळविले आहे