बंद

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ‘धूत’मध्ये कोविड रुग्णांसाठीच्या सुविधेत वाढ

प्रकाशन दिनांक : 03/09/2020

औरंगाबाद, दि.02(जिमाका) :  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नुकतीच विविध खासगी रुग्णालयांची पाहणी केली. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रुग्णालयांना दिलेल्या भेटीदरम्यान केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद कृतीतून देताना शहरातील धूत हॉस्पीटलने कोविड रुग्णांवर उपचाराच्या सुविधेत वाढ केली आहे. या रुग्णालयाने दोन अतिदक्षता कक्ष व वॉर्डामध्ये 9 खाटांची वाढ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर केली असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणेयांनी दिली.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी या संकटाचा वैज्ञानिकदृष्टीने सामना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर असावा. खासगी रुग्णालयांनी ‘आपण समाजाचे देणे लागतो’ या भावनेतून या संकटकाळात रुग्णांवर उपचार करावेत. ‘गिव्हींग बॅक टू सोसायटी’ ही लोकचळवळ, आरोग्य चळवळ जिल्ह्यात उभा करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले होते. कोरोनाच्या या संकटात रात्रंदिवस काम करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेला पाठबळ व त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी धूत हॉस्पीटलला देखील भेट दिली होती.

भेटीवेळी या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी केवळ 17 अतिदक्षता कक्ष (आयसीयू) होते, त्यात जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर दोनची वाढ करण्यात आली आहे. तर कोविड जनरल वॉर्डमध्ये नव्याने नऊ खाटांची अधिक उपलब्धता करून देण्यात आल्याने आता 44 खाटा उपलब्ध झालेल्या आहेत. जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या या भेटीने धूत रुग्णालयाच्या रुग्णसुविधेत याप्रकारे वाढ झाली असल्याचेही श्री. गव्हाणे म्हणाले.