सार्वजनिक गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याबाबत जिल्हाधिकारी व्दारा सूचना जारी

प्रकाशन दिनांक : 19/07/2021
सार्वजनिक गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याबाबत जिल्हाधिकारी व्दारा सूचना जारी

 औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका): कोविड -19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाकडून  मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट आटोक्‍यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने कोविड-19 ची तिसरी लाट येत्‍या काही दिवसांत येण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.

        त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्‍हयातील सर्व जनतेला सार्वजनिक गणेशोत्‍सव साजरा करण्‍याबाबत काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्याव्दारे खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्‍यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून लागू करण्‍यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्‍यामध्‍ये गणेशोत्‍सवानिमित्‍त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

       अ.क्र.

काय करावे

काय करु नये

 

01

कोविड -19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करावे.

 

कोविड-19 या विषाणुच्‍या प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने कोणत्‍याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्‍या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्‍लंघन करण्‍यात येवू नये.

 

 

02

 सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांनी संबंधित स्‍थानिक प्रशासनाची परवानगी घ्‍यावी. महापालिका तसेच संबंधित स्‍थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादीत स्‍वरुपाचे मंडप उभारण्‍यात यावेत.

 

गणेशोत्‍सव मंडळांनी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या पूर्वपरवानगी शिवाय सार्वजनिक गणपतीची स्‍थापना व मंडप लावू नये.

03

यावर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करावा.

घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्‍यात भपकेबाजी नसावी.

 

 

04

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 04 फूट व घरगुती गणपतीकरीता 02 फूटांच्‍या मर्यादेत असावी तसेच  शक्‍यतो घरीच धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्‍यास त्‍याचे विसर्जन शक्‍यतो घरीच करावे.

शासनाच्‍या निर्देशानुसार, सार्वजनिक मंडळांकरिता 04 फूट व घरगुती गणपतीकरीता 02 फूटांपेक्षा जास्‍त मोठया गणेश  मुर्तीची स्‍थापना करण्‍यात येवू नये, शक्‍यतो Plaster of Paris ची मुर्ती वापरु नये.

    

05

उत्‍सवाकरिता वर्गणी/देणगी स्‍वेच्‍छेने दिल्‍यास त्‍यांचा स्‍वीकार करावा.

 सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी वर्गणीबाबत आग्रह धरु नये.

06

आरोग्‍यविषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिराती प्रदर्शित करण्‍यास पसंती देण्‍यात यावी.

जाहिरातीच्‍या प्रदर्शनाच्‍या ठिकाणी गर्दी करु नये.

07

 सांस्‍कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्‍य विषयक उपक्रम/शिबीरे उदा. रक्‍तदान आयोजित करण्‍यास प्राधान्‍य दयावे, तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्‍यु इ. आजार आणि त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता याबाबत जनजागृती करण्‍यात यावी. 

उपक्रम/शिबीरांच्‍या ठिकाणी शारीरिक अंतर (फिजीकल डिस्‍टन्सिंग) चा भंग करु नये व गर्दी करु नये.

08

ध्‍वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

आरती, भजन, किर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी करु नये.

09

15.                 स्‍थानिक प्रशासनाकडुन श्रीगणेशाच्‍या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादीद्वारे उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत जास्‍तीत जास्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

सार्वजनिक गणेश मंडळाच्‍या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करु नये. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी महाप्रसाद, भंडारा इत्‍यादींचे आयोजन करु नये.

10

गणपती मंडपामध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. सार्वजनिक गणेश मंडळाच्‍या ठिकाणी शारीरीक अंतराचे  पालन करावे व मास्‍क आणि सॅनिटायजरचा वापर करावा.

 शारीरिक अंतर (फिजीकल डिस्‍टन्सिंग) चा भंग करण्‍यात येवू नये.

11

 घरगुती गणपतीचे घरातच /स्‍थानिक प्रशासनाच्‍या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.

 श्रीगणेशाच्‍या आगमन व विसर्जनप्रसंगी मिरवणुका काढू नये व अनावश्‍यक ध्‍वनी प्रदुषण करु नये. तसेच संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्‍या विसर्जनाची मिरवणूक एकत्रीतरित्‍या काढण्‍यात येऊ नये.

12

विसर्जन स्‍थळी होणारी आरती घरीच करावी व विसर्जन स्‍थळी कमीत कमी वेळ थांबावे.

लहान मुले आणि वरीष्‍ठ नागरिकांनी सुरक्षेच्‍या दृष्‍टीने  विसर्जनस्‍थळी जावू नये.

13

महापालिका,विविध मंडळे, गृहनिर्माण संस्‍था, लोक प्रतिनीधी,स्‍वयंसेवी संस्‍था इत्‍यादींच्‍या मदतीने गणेशमूर्तीच्‍या विसर्जनाकरीता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍यात यावी.

विसर्जनस्‍थळी अनावश्‍यक गर्दी करु नये.